कोरोना संकट ः नेत्यांचा जोर अन् कार्यकर्त्यांच्या जीवाला घोर!

Foto
राजकारण्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
आंदोलनातील गर्दीने कोरोना संसर्गाचा वाढला धोका
शहरात सध्या आंदोलनाला जोर चढला आहे. गेल्या आठ दिवसांपासून क्रांती चौक, भडकल गेट, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय, टीव्ही सेंटर सर्वच भागात वेगवेगळे राजकीय पक्ष, संघटना आंदोलने करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भाजपने केलेल्या आंदोलनात तोबा गर्दी होती. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. त्यामुळे आपल्याला संसर्ग तर होणार नाही ना अशा चिंतेत कार्यकर्ते स्वतःला सावरत होते. एकंदरीत नेत्यांचा जोर अन् कार्यकर्त्यांना कोरोनाचा घोर अशी परिस्थिती सर्वत्र आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या आंदोलनाचे सत्र सुरू आहे. सोमवारी दिवसभर किमान चार ते पाच संघटनांनी जोरदार आंदोलन केले. वेगवेगळ्या मागण्या आणि तक्रारींचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून सर्वाधिक आंदोलने होत आहेत. तर केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी बिलाचा विरोध करीत अनेक राजकीय पक्षही आंदोलन करीत आहेत. आज भाजप ग्रामीणतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी बिलाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. 
राज्य सरकार या बिलाची राज्यात अंमलबजावणी करणार नसल्याने भाजपने आंदोलन केले. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह राधाकिशन पठाडे आदी नेते हजर होते. 
प्रचंड घोषणाबाजी आणि जिंदाबाद मुर्दाबाद ने परिसर दणाणून गेला.शंभराहून अधिक कार्यकर्ते अत्यंत कमी जागेत घोळका करून होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग उरलेच नाही. मास्क ही नावालाच होता. कारण घोषणा देताना मास्क सरळ खाली सरकत होता. मास्क वर खाली करतांना अनेकांची दमछाक झाली. आमदार बागडे यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दात टीका केली. राज्य सरकार शेतकरी विरोधी असून दलालांचा कैवार घेणारे असल्याचा आरोप बागडे यांनी यावेळी केला.
दरम्यान गेल्या काही दिवसात शिवसेना, काँग्रेस सह इतर पक्ष संघटनांनी विविध विषयांवर जोरदार आंदोलने केली. आजही भाजपचे आंदोलन लक्षवेधी ठरले. मात्र या आंदोलनात नेते आक्रमकपणे बाजू मांडत असताना कार्यकर्ते मात्र कोरोनाच्या भीतीने काहीसे सावध दिसून आले. त्यामुळे नेत्यांचा जोर असला तरी कार्यकर्त्यांच्या जीवाला मात्र कोरोनाचा घोर तर लागला नाही ना, असे बोलले जाते.
पोलिसांची आंदोलकांकडे डोळेझाक
या आठवड्यात विविध राजकीय व सामाजिक संघटनादडून उत्तरप्रदेश येथील हाथरस प्रकरण, मराठा आरक्षण प्रकरण, कृषी कायद्याच्या विरोधात व राज्य सरकारने रद्द केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ, धनगर समाज आरक्षण आदी प्रश्नांवर आंदोलने केली जात आहे. आंदोलनाला कमी व्यक्तींची परवानगी असताना देखील प्रत्यक्ष आंदोलनात मात्र शेकडो कार्यकर्ते सहभागी झालेले दिसून आले. सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे यात मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु पोलीस प्रशासनाने मात्र याकडे डोळेझाक केले असल्याचे दिसून आले. एकही राजकीय पक्षाच्या विरोधात पोलिसांनी गर्दी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. वस्तविक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जनजागृती करत शासनाचे नियम पाळणे आवश्यक आहे पण सगळ्याच राजकीय पक्षांनी हे नियम पाळले नसल्याचे दिसून आले आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी आढळून येत असल्याचे समोर येत आहे. परंतु दुसरीकडे याउलट चित्र दिसून येत आहे. आंदोलनात गर्दी करून कोरोनाचा आणखी धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker